Saturday, January 15, 2011

पुणेकर हा कोण? का? आणि कशाला?


ह्या प्रश्नांचं उत्तर जर आपल्या लाडक्या पुलंनी दिलं असतं तर खूप आवडलं असतं, पण आता तुमच्या कडे फक्त हा तुटका-फुटका मराठी बोलणारा दिवेश आहे, तर तेवढे सांभाळून घ्या.



ह्या प्रश्नांना आपण शास्त्रीय दृष्टीने सोडवायचा विचार जर केला तर आपल्याला डझनभर पुणेकरांना घेऊन प्रयोगशाळे मध्ये टेस्ट करायला लागेल. त्यात एक नवीन प्रश्न उभा होतो, ही टेस्ट करणार कोण? सगळ्यांना माहित आहे कि जर एखादी जरी चूक झाली तर ते प्राणघातक ठरेल. आणि जर हाच प्रश्न कोणत्याही पुणेकराला विचारला तर ते त्याला पोकळ बाम्बुनी नक्की धुणार.

हा प्रश्न मलाही खूप वेळा पडला, उत्तर कसं शोधायचं यासाठी तर्क-वितर्कहि लावले...पण काही उपयोग नाही आणि म्हणूनच हा निबंध लिहण्याच ठरवलं.

पाच वर्ष झाली तरी शेजार्यांना न ओळखणारा, पण मोक्याचा क्षणी न विचारता मदद करणारा म्हणजे पुणेकर. स्वतःच्या पाचकळ विनोदांवर तोंड फाडून हसणारा आणि न कळलेल्या विनोदाला कमरेच्या खालचा ठरवणारा. आधुनिक वेश-भूशेला टुकार म्हणणारा आणि कोटाच्या खाली धोतर घालून फिरणारा म्हणजे पुणेकर. स्वताची चूक असेल तर त्वरित माफी मागणारा पण दुसऱ्याची चूक असेल तर “मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफले उचलणार नाही” असे म्हणणारे लोकमान्य ही पुणेकरच.

पुणेकर म्हणजे... घर आणि दुकाना बाहेर डोक्याला ताप देईल अश्या पाट्या लावणारा आणि कमीत कमी शब्दांमध्ये खूप काही सांगून जाणारा.


पुण्या मध्ये वर्षानुवर्ष रहाणारा तो पुणेकर नाही तर पुणेकर म्हणजे पुणेरी रंगात आणि ढंगात नखशिखात चिंब भिजलेला…

ह्या जगा मध्ये कुठेही राहत असेल तरीही पुणेरी होण्याचा आभिमान असणारा खरा पुणेकर. पुणेरी रंग म्हणजे कोणताहि प्रिंटरच्या गणिता मध्ये न बसणारा……असा आहे पुणेकर आणि पुणेरी रंग





पुणेकर म्हणजे मी... माझ्या मधलं पोक्त झालेला बाळ.



का?... कारण मी रंगलोय पुणेरी रंगात आणि कशाला?... ते कळायला तुम्हाला पुणेकरच व्हायला लागेल आणि एकदा झाले तर तुम्ही असले फालतू प्रश्न विचारणार नाही.


-निर्जीव

ता.क. - वर लिहिलेल्या निबंधावर काही प्रश्न पडल्यास आणि त्याचे उत्तर हवे असल्यास... प्रथम कबूल करा कि तुम्ही मूर्ख आहात...आणि जर हे कबूल केलंच आहे तर हे पण समजून घ्या कि आम्ही मुर्खांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत नाही.